भुसावळ ( प्रतिनिधी ) – रस्त्यात उभे का राहतात? याचा जाब विचारल्याच्या वादातून रेल्वेतील तिकीट निरीक्षकाला शिविगाळ करत मारहाण करून त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकल्याची घटना पंधरा बंगला परिसरातील एलोरा कॉलनीत २२ रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील एलोरा कॉलनीमधील पंधरा बंगला परिसरातील विश्वंभर दयालचंद मूलचंद (वय ३) हे रेल्वेत टिटीआय आहेत. शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता ते परिचितांसह रस्त्यात बोलत असताना संशयित शकील पिंजारी हा रस्त्यावरून जात होता. त्याने मूलचंद यांना रस्त्यात का उभे आहेत? असा जाब विचारल्याने दोघांमध्ये शाब्दिक वाद वाढून हाणामारीपर्यंत पोहोचला. या वेळी शकील पिंजारीसह त्याची आई व बहिण (नाव माहित नाहीत) यांनी शिविगाळ करत त्यांना मारहाण केली. तसेच शकील याने लोखंडी रॉड मूलचंद यांच्या डोक्यात मारून दुखापत केली. या प्रकरणी संशयितांविरोधात बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जितेंद्र पाटील करत आहेत.