चोपडा शहर पोलीस स्टेशनची कारवाई
चोपडा ( प्रतिनिधी ) – मध्यप्रदेशातून दुचाकीवर प्लॅस्टिक गोणीतून गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडून अटक केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी शहरात घडली. तर एक संशयित आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी तिघा संशयितांकडून १ लाख १८ हजार रुपये किंमतीचा १२ किलो गांजासह दोन दुचाकी, दोन अँड्रॉईडमोबाईल असा एकूण २ लाख ४२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चौघांवर चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातील चार जण दोन दुचाकीवरून प्लॅस्टिक गोणीतून गांजा घेऊन चोपडा शहरात येत असल्याची गोपनीय माहिती शहरचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांना मिळाली होती. त्यांनी शहरात नवीन तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांचा सापळा लावून वाहनांची तपासणी सुरू केली.
यावेळी मध्यप्रदेश पासिंगच्या दोन दुचाकी आल्या असता पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली असता त्यांचेकडे प्लॅस्टिक गोणीत गांजा आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन मध्यप्रदेशातील तिघा संशयितांकडून १ लाख १७ हजार ६०० रुपये किंमतीचा ११ किलो ७५९ ग्रॅम वजनाचा गांजा, ६० हजार रुपये किंमतीची एक आपाची कंपनीची निळ्या रंगाची दुचाकी, ५० हजार रुपये किंमतीची एक होन्डा सीडी डीलक्स कंपनीची काळया लाल रंगाची दुचाकी व १४ हजार रुपये किंमतीचे दोन अँड्रॉईड मोबाईल असा एकूण २ लाख ४२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी संशयित सचिन सायसिंग बर्डे (२३, रा. निशान्यापाणी ता. वरला), अनिल झान्या बारेला (२५,रा. आमल्यापाणी ता. वरला), रुमशा पिदा बारेला (४०, रा. पांजऱ्या धवली) यांना अटक करण्यात आली आहे. अनिल विक्रम पाडवी रा. लाकड्या हनुमान, ता. शिरपूर (जि. धुळे) हा संशयित आरोपी फरार झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर सावळे करीत आहेत.