नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) ;- मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईच्या बंगल्यात भाजप नेत्यांची बैठक बोलविण्यात आली आहे.
मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे ठाकरे सरकारने तातडीने यावर तोडगा काढता यावा यासाठी मोदी सरकारकडे मागणी केली होती. त्यामुळेच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण हे आज सकाळीच मुंबईहून दिल्लीला विशेष विमानाने रवाना झाले होते. सकाळी 9 च्या सुमारास दिल्ली विमानतळावर त्यांचे आगमन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र सदनाकडे जाणार होते. पण पंतप्रधान मोदी यांच्या निवास्थानाकडे जाण्यास उशीर होत असल्यामुळे महाराष्ट्र सदनात न जाता थेट पंतप्रधानांच्या निवास्थानाकडे रवाना झाले.
पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सकाळी 11 वाजेच्या सुमारास भेट झाली.
अशोक चव्हाण यांनी यावेळी नरेंद्र मोदींसमोर मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला असल्याची माहिती दिली. मराठा आरक्षणातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातील महत्वाचे मुद्दे मोदींच्या निदर्शनास आणून दिले असे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले. ‘आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथील करावी, अन्यथा राज्यांना अधिकार देऊनही आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार नाही,’ अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. तसा युक्तिवाद सुप्रीम कोर्टात झाला पाहिजे असे मतही यावेळी त्यांनी व्यक्त केले.