जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाच्या पथकाला यश
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील एका ६९ वर्षीय महिलेला थायरॉईड संबंधित आजार जडला होता. त्यामुळे तिला जगणे मुश्किल झाले होते. मुंबईतदेखील तिला उपचार झाले नाही. अखेर या महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार होऊन शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे तिला दिलासा मिळाला. उपचार पूर्ण झाल्यावर तिला अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांचे हस्ते डिस्चार्ज देण्यात आला.
पोलीस लाईन, जळगाव येथील ६९ वर्षीय महिला ही थायरॉईड ग्लॅन्ड या आजाराने ग्रस्त होती. त्यांनी उपचारासाठी मुंबई गाठली. तेथे शस्त्रक्रिया होणार नाही म्हणून सांगण्यात आले. अखेर महिलेच्या नातेवाईकांनी त्यांना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शल्यचिकित्सा विभागात दाखविले. तेथे विविध तपासण्या करून युनिट प्रमुख डॉ. रोहन पाटील यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
सदर महिलेवर शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून तिला आता आजारातून दिलासा मिळाला आहे. सदर महिलेवर उपचार करण्याकामी विभागप्रमुख डॉ. मारोती पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रोहन पाटील, डॉ. ईश्वरी भोंबे, डॉ. हर्षदा चौधरी, डॉ. सुनील गुट्टे, डॉ. जैद यांचेसह बधिरीकरण शास्त्र तज्ज्ञ डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. अमित हिवरकर, डॉ. माधुरी पाटील, शस्त्रक्रियागृहाच्या इन्चार्ज परिचारिका तुळसा माळी, कक्ष ८ च्या इन्चार्ज सुरेखा महाजन यांनी परिश्रम घेतले. उपचार पूर्ण झाल्यावर महिलेला अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांचे हस्ते डिस्चार्ज देण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड उपस्थित होते.