चाळीसगाव तालुक्यासह इतर तालुक्यांनाही होणार लाभ
चाळीसगाव (विशेष प्रतिनिधी) :- चाळीसगाव तालुक्यासाठी एक महत्त्वाची आणि दूरदृष्टीची विकास परियोजना वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. तालुक्यातील तीन प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या टेकवाडे-ऋषीपांथा-पाटणादेवी रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. हायब्रीड ॲन्युइटी योजनेंतर्गत हा रस्ता तयार होत असून, यामुळे चाळीसगावच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
हा रस्ता धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः श्रावण महिन्यात ऋषींपांथा येथे श्रावणी सोमवारी भाविकांची प्रचंड गर्दी होते. तसेच, राधा अष्टमी आणि ऋषी पंचमीच्या दिवशी जळगाव, धुळे, नाशिक आणि संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यांतून येणाऱ्या भाविक भक्तांना सध्या रस्त्यांमुळे होणारी गैरसोय यामुळे पूर्णपणे दूर होईल. या प्रकल्पामुळे चाळीसगावच्या पर्यटन क्षेत्राला भविष्यात एक नवी दिशा मिळेल. दळणवळण सुलभ झाल्याने भाविकांची संख्या वाढेल आणि परिसरातील धार्मिक तसेच पर्यटनस्थळांना अधिक महत्त्व प्राप्त होईल. हा प्रकल्प केवळ एक रस्ता नसून, तालुक्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.