देशभरातील ३०० खेळाडूंचा सहभाग; आजपासून रंगणार सामने
जळगाव (प्रतिनिधी) :- अनुभूती रेसिडेन्शियल स्कूलमध्ये सीआयएससीई राष्ट्रीय मुलींची तायक्वांडो स्पर्धो आयोजित करण्यात आली आहे. १४, १७ व १९ वर्षाखालील मुलींच्या गटात देशभरातील सुवर्ण पदक विजेत्या ३०० वर खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. दि. १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान या स्पर्धा अनुभूती स्कूल मधील बॅडमेंटन हॉल येथे होतील.
सीआयएससीई राष्ट्रीय प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर अनुभूती स्कूलवर सीआयएससीई बोर्ड तर्फे तायक्वांडो राष्ट्रीय मुलींची स्पर्धा घेण्याची जबाबदारी दिली आहे. केरळ, ओडीसा, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, तेलंगणा, पश्चिम बंगाल, पंजाब राज्यांतील महिला खेळाडू यामध्ये आपले कौशल्य दाखवतील. इलेक्ट्रोनिक स्कोरिंग सिस्टीम्स नुसार ही स्पर्धा घेण्यात येईल. देशभरातून विविध १५ राज्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पंच कार्यरत राहतील. अनुभूती निवासी स्कूल मुख्य आयोजक असून जैन स्पोर्टस अकॅडमी व जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांचे सहकार्य लाभत आहे.
महाराष्ट्र संघात अनुभूती स्कूलच्या तीन खेळाडूंचा सहभाग
राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघामध्ये अनुभूती निवासी स्कूलच्या पलक सुराणा, सुमृद्धी कुकरेजा, अलेफिया शाकीर या महिला खेळाडूंची १९ वर्षे आतील वयोगटात महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत तिघांनी सुवर्णपदक प्राप्त केले होते. त्यांच्या सोबत रौप्य पदकावर मुक्ती ओसवाल, जान्हवी जैस्वाल तर कांस्यपदकावर समिक्षा पवार, शाईनी जैन, साची पाटील, स्पर्श मोहिते नाव कोरले. यावेळी दिया देशपांडे, साधना देशमुख, अदिती कुकरेजा, भाविका पाटील यांनीही विशेष छाप सोडून सहभाग नोंदविला होता.