जळगाव तालुक्यातील नशिराबाद टोलनाक्यावरील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरापासून जवळ असलेल्या नशिराबाद टोल नाक्याजवळ मंगळवारी दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात बसचे टायर फुटल्याने चाकाखाली येऊन महिला प्रवाशाचा मृत्यू झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

अमळनेर आगाराची बस क्रमांक (एमएच-१४ बीटी-२३०६) ही जळगावकडून भुसावळकडे जात असताना हा अपघात झाला. साराबाई गणेश भोई (वय ४६ रा. पाडळसा ता.यावल) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पती व तीन मुले असा परिवार आहे. पती शेंगदाणे, फुटाणे विक्री करून उदरनिर्वाह करतात.(केसीएन)मयत महिला साराबाई भोई ह्या डोळे तपासण्यासाठी जळगाव शहरात आलेल्या होत्या. डोळे तपासणी केल्यानंतर त्या घरी पाडळसा येथे घरी जात होत्या.
बस नशिराबाद टोल नाक्याजवळून जात असताना अचानक बसच्या समोरील चाकांपैकी एक टायर भरधाव वेगात फुटले. त्यामुळे बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरकटलेली बस थेट टोल नाक्याजवळील एका भिंतीवर जाऊन आदळली.
या अपघाताच्या धक्क्याने बसमध्ये साराबाई गणेश भोई या देखील बसमधून खिडकीतून बाहेर फेकली गेली. दुर्दैवाने, त्या बसच्या मागील चाकाखाली आली आणि चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अपघात घडताच स्थानिक नागरिक आणि टोल नाक्याजवळील वाहनधारकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याला सुरुवात केली. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी मदत कार्य आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने कार्यवाही केली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.









