जळगाव शहरात आकाशवाणी चौकातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील आकाशवाणी चौकात कंपनीमधून घरी परतण्यासाठी जाणाऱ्या व बसमध्ये चढणाऱ्या तरुणीच्या खिशातून चोरट्याने मोबाईल लांबविला. त्यानंतर तो रिक्षात बसून पळून जात असताना त्याला नागरिकांनी पकडले. ही घटना शुक्रवारी दि. ६ सप्टेंबर रोजी आकाशवाणी चौकानजीक घडली. रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अर्शद शेख रईस (२१, रा. तांबापुरा) याला अटक करण्यात आले आहे. चोरगाव, ता. धरणगाव येथील एक तरुणी जळगावातील कंपनीमधून शुक्रवारी संध्याकाळी घरी जाण्यासाठी आकाशवाणी चौकात एका बसमध्ये चढत होती. तिच्या खिशातून एकाने मोबाईल चोरला. तरुणीने आरडाओरड केली. त्या वेळी हा चोरटा एका रिक्षात बसला. नागरिकांनी रिक्षा थांबविली त्या वेळी त्याने मोबाईल बाजूला फेकला व तो सदर तरुणीच्या हाती लागला. या प्रकरणी तरुणीने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अर्शद शेख रईस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.