भुसावळ शहरातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- शहरातील पंचशील नगरामध्ये काहीही कारण नसताना शिवीगाळ करत धारदार चाकूने छातीवर वार करून तरुणाला दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमन विनायक जामनकर (वय-२४, रा. पंचशील नगर, भुसावळ) हा तरुण परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी दिनांक १० डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजता अमन जामनकर हा पंचशील नगरातील एका दुकानासमोर उभा असताना संशयित आरोपी रोहित उर्फ बाळा सोनवणे रा. पंचशील नगर, भुसावळ हा त्याच्याजवळ आला आणि काहीही कारण नसताना शिवीगाळ करत त्याच्या हातातील चाकूने छातीवर वार करून गंभीर दुखापत करत पसार झाला.
दरम्यान या घटनेबाबत अमन जामनकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी ११ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी रोहित उर्फ बाळा सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ करीत आहे.