भुसावळ शहरात खडका रोडवरील घटना
भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील खडका रोड परिसरातील अन्सार उल्लाह नगर येथे किरकोळ वादातून एका तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला झाल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत शेख जुलकीफ शेख मोहम्मद तलहा (वय २३, धंदा – डेअरी, रा. अन्सार उल्लाह नगर, भुसावळ) हा जखमी झाला आहे. शेख जुलकीफ याचे मोठे काका मोहम्मद अशपाक यांच्या मुलीचे लग्न अब्दुल सत्तार हॉल येथे होते. लग्नाच्या कामानिमित्त त्याचा लहान भाऊ मोटारसायकल घेऊन आला होता. लग्नानंतर शेख जुलकीफ ही मोटारसायकल घेऊन घरी जात असताना दुपारी साधारणपणे चारच्या सुमारास गल्लीमध्ये सिराज गवळी, फयाज गवळी व गुड्डू गवळी हे उभे होते.
त्यांनी “हा गल्लीचा रस्ता आहे, तुझी भंगार मोटारसायकल आवाज करते, तू या रस्त्याने ये-जा करू नकोस” असे म्हणत शेख जुलकीफ याला थांबवले. त्यानंतर तिघांनी एकत्र येऊन त्याला शिवीगाळ केली. समजावण्याचा प्रयत्न करताच सिराज गवळी आणि गुड्डू गवळी यांनी चापटा-बुक्यांनी मारहाण केली, तर सिराज गवळी याने घरातून लोखंडी रॉड आणून शेख जुलकीफच्या मानेवर आणि खांद्यावर प्रहार केला.
या घटनेत जुलकीफ याला गंभीर दुखापत झाली. मोहम्मद अशपाक यांनी भांडण सोडवून त्याला जवळील दवाखान्यात नेले. प्राथमिक उपचारानंतर तो पुन्हा डेअरीवर गेला असता चक्कर आणि उलटी झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून डाव्या खांद्यावर आणि मानेवर मार लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
या प्रकरणी शेख जुलकीफ शेख मोहम्मद तलहा यांनी सिराज गवळी, गुड्डू गवळी आणि फयाज गवळी यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.









