चोपडा तालुक्यातील गलवाडे येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- चोपडा तालुक्यातील गलवाडे येथे एका तरुणाने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि. २४ जून रोजी सकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राहुल राजेंद्र भिल (वय १९, रा. गलवाडे ता. चोपडा) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गावात आई, १ भाऊ, २ बहिणी यांच्यासह राहत होता. हातमजुरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.(केसीएन)दरम्यान रविवारी दि. २२ रोजी त्याने शेतात जाऊन विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्या ग्रामस्थांना माहिती कळताच त्यांनी राहुल भिल याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
उपचार सुरु असताना मंगळवारी दि. २४ रोजी राहुल याचा सकाळी ६ वाजता मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. घटनेमुळे गलवाडे गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, तरुणांच्या आत्महत्या चिंतेचा विषय बनत चालला आहे.