भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनची कारवाई
भुसावळ (प्रतिनिधी) : बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील पाटील मळा भागातील फळ विक्रेत्याकडे चोरट्याने भर दिवसा घरफोडी करीत २८ हजारांच्या रोकडसह १ लाख ४४ हजारांचे दागिने लांबवले होते. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनने तपास लावून फिर्यादीच्या पत्नीच्या चुलत भावालाच गुन्ह्यात अटक केली आहे.
सोमवारी दुपारी दोन ते अडीच वाजेदरम्यान हा प्रकार समोर आला होता तर भर दिवसा झालेल्या धाडसी घरफोडीमुळे नागरिक धास्तावले होते. बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासात घरफोडीची उकल करीत संशयित आरोपी रिजवान फकीरा बागवान (३८, रा. जाम मोहल्ला, भुसावळ) यास अटक केली. संशयित आरोपीकडून १ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
इब्राहिम इलियास बागवान (३०, रा. मुंजोबा मंदिराजवळ, पाटीलवाडा, भुसावळ) यांच्या नातेवाईकांचे लग्न असल्याने ते कुटुंबातील सदस्यांसह गावातच सोमवारी दुपारी लग्नाला गेले होते. ही संधी साधून संशयित आरोपी रिजवान बागवानने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. घरातील लोखंडी कपाटातून सोन्या-चंदीचे दागिने आणि २८ हजार रुपयांची रोकड मिळून एक लाख ७२ हजार ५०० रुपयांना ऐवज लांबवला. तक्रारदाराच्या पत्नीचा संशयित आरोपी हा दूरच्या नात्याने भाऊ असून त्याचे बागवान यांच्याकडे येणे-जाणे होते. पोलिसांच्या तपासात व सीसीटीव्हीतही ही बाब स्पष्ट होताच संशय बळावला. व आरोपीला पकडताच त्याने गुन्ह्याची कबुली देत मुद्देमाल काढून दिला.
ही कारवाई भुसावळ पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, एएसआय हसमत अली सैय्यद, हवालदार विजय बळीराम नेरकर, हवालदार रमण काशीनाथ गुरळकर, हवालदार महेश एकनाथ चौधरी, कॉन्स्टेबल जावेद हकीम शाह, कॉन्स्टेबल राहुल विनायक वानखेडे, कॉन्स्टेबल अमर सुरेश अदाळे, कॉन्स्टेबल प्रशांत रमेश परदेशी आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.