अमळनेर पोलीस स्टेशनची चोपडा रस्त्यावर कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : अमळनेर ते चोपडा रस्त्यावर सार्वजनिक जागी गुरुवार दि. २८ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अमळनेर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी धाडसी कारवाई केली. २ तरुणांकडून २ गावठी पिस्टल आणि ६ जिवंत काडतूस विनापरवाना बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
अमळनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार अमळनेर शहरातील चोपडा रस्त्यावर आसाराम बापू आश्रमाच्यासमोर पोलिसांनी सापळा रचला. यात गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास संशयित आरोपी विशाल भैय्या सोनवणे (वय १८, रा. ढेकुसिम ता. अमळनेर) आणि गोपाल भीमा भिल (वय ३०,रा. सत्रासेंन ता. चोपडा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत २ गावठी पिस्टल आणि ६ जिवंत काडतूस आढळून आले. त्यानुसार त्यांना शुक्रवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणी १ लाख ६६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी केली. तपास उपनिरीक्षक नामदेव बोरकर हे करीत आहेत.