जामनेर तालुक्यात वाकोद येथे २ जणांवर गुन्हा दाखल
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील वाकोद येथील युवकाला लघवी केल्याच्या किरकोळ कारणावरून मारहाण झाल्याची घटना घडली होती. पुन्हा मारहाण करू, अशी धमकीदेखील संबधीतांनी दिल्याने तरूणाने विष सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान जळगाव येथे गुरुवारी त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पहूर पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकबर वजीर तडवी (वय २९, रा. वाकोद ता. जामनेर) असे मृत तरूणाचे नाव आहे. वाकोद गावी दि. ७ रोजी अकबर वजीर तडवी याने लघवी केल्याच्या कारणावरून वाकोद येथील सरपंच पती दिपक बाबुराव गायकवाड (वय ४०) व भैय्या मधुकर बोराडे (वय ३०) यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली होती. तसेच धमकावून दुसऱ्या दिवशी पुन्हा मारू, अशी धमकी दिली होती. याचदिवशी रात्री अकबरने विषारी औषध घेतले. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे उपचार सुरू होते.
उपचारादरम्यान गुरूवारी दि. ९ रोजी त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या आत्महत्येस कारणीभूत हे दोघे असल्याचे मयताचे वडील वजीर गंभीर तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताच्या नातेवाईकांनी तरूणाचा मृतदेह घेऊन पहूर पोलिस स्टेशनला धडक मारली. संबधीत व्यक्तींविरूद्ध गुन्हा दाखल करा त्यानंतर अंत्यसंस्कार करणार असल्याची भूमिका मांडली. जळगाव येथील मयताची कागदपत्रे मिळताच गुरुवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर युवकाचा मृतदेह वाकोद गावी नेण्यात आला.