जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुसुंबा येथे एका १८ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दि. ३० ऑगस्ट रोजी संध्याकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
यश दीपक पाटील (वय १८, रा. कुसुंबा ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. वडील मजुरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी यश याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच कुटुंबीयांनी तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून यश याला मयत घोषित केले.
यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, यश याने आत्महत्या का केली हे अस्पष्ट आहे. घटनेबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.