पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुरंगी येथे मनोज सुखदेव पाटील या तरूणाने मध्यरात्री विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. यासंदर्भात चिठ्ठी लिहून स्वतःचे जीवन संपविले. या घटनेची पाचोरा पोलिसात नोंद करण्यात आली असून पोलीस स्टेशनला दाखल असलेली मागील तक्रार मागे घेण्यासाठी धमकी देउन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
मनोज सुखदेव पाटील (वय ३३, रा. कुरंगी) यांची पत्नी सरला पाटील हिने दि. ५ मार्च रोजी गावातीलच दीपक आनंदा मोरे याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यामुळे दीपक मोरे हा वारंवार तक्रार मागे घेण्यासंदर्भात मनोज यास धमकी देत होता. या धमकीमुळे गेले काही दिवस मनोज पाटील हे नैराश्यग्रस्त होते. त्यातूनच त्यांनी विष प्राशन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या जाचाला कंटाळून मनोज सुखदेव पाटील याने दि. २४ रोजी मध्यरात्री शेतात जाऊन विष प्राशन केले. आत्महत्येसंदर्भात चिठ्ठी लिहून दीपक मोरे त्रास देत असल्याने आपण जीवन संपवित असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहीले होते. याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दीपक मोरे याला अटक करण्यात आली आहे.