‘अपघात नाही, खून’ असल्याचा आईचा गंभीर आरोप; तिघांवर गुन्हा दाखल, एकाला अटक
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील खेडी रोड परिसरात एका धक्कादायक घटनेत, भांडणानंतर हर्षल प्रदीप भावसार (वय ३१, रा. दिनकर नगर, जुना आसोदा रोड) या तरुणाचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला आहे. हा अपघात नसून खून असल्याचा गंभीर आरोप मृत हर्षलची आई सौ. ज्योती प्रदीप भावसार यांनी करत शनिपेठ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, दि. १६ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३० वाजता हर्षल घरी चिकन आणून आईला जेवण करण्यास सांगून बाहेर पडला. रात्री उशीर होऊनही तो परत न आल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मोबाईल बंद आढळला. सकाळी ९.३० च्या सुमारास हर्षलच्या मित्राने त्याच्या आईला सिव्हील हॉस्पिटलमध्ये बोलावले. तिथे पोस्ट मॉर्टम रूममध्ये हर्षलचा मृतदेह स्टेचरवर आढळला, ज्यावर कान, नाक, डोके व जबड्याजवळ गंभीर जखमा आणि रक्त दिसून येत होते.
जळगाव–भादली तिसऱ्या रेल्वे लाईनवर रेल्वेचा फटका लागून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र, हर्षलचा मित्र विजय उर्फ भुरा सपकाळे याने सिव्हीलमध्ये पोलिसांना कही माहिती दिली. यानुसार पोलीसांनी सीसीटीव्ही तपासाले दि. १६ नोव्हेंबर रोजी रात्री १० ते १०.३० दरम्यान ओंकार हॉटेल, खेडी रोड येथे हर्षलचे भुषण संजय महाजन व लोकेश मुकुंदा महाजन यांच्यासोबत भांडण झाले असल्याचे स्पष्ट झाले.
फिर्यादीत नमूद नुसार भुषण संजय महाजन, लोकेश मुकुंदा महाजन आणि परेश संजय महाजन या तिघांनी मिळून हर्षल भावसार याला ओंकार हॉटेल व काशिबाई शाळेच्या मागील रस्त्यावर मारहाण केली. त्यानंतर त्याला मोटारसायकलवर बसवून घेऊन गेले.या तिघांनी मिळून हर्षलचा खून करण्याच्या उद्देशाने त्याला भादली तिसऱ्या रेल्वे लाईनवर टाकून दिले, ज्यामुळे त्याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला.असा बनाव केला.
पती उपचारासाठी बाहेरगावी असल्याने आणि घटनेने मानसिक धक्का बसल्याने सौ. ज्योती भावसार यांना तातडीने तक्रार देता आली नाही. नंतर भाऊ मयुर भावसार आणि बहीण रूपाली भावसार यांच्यासह त्या शनिपेठ पोलीस ठाण्यात आल्या आणि त्यांनी तिघांविरुद्ध मारहाण व खुनाचा संशय व्यक्त करत अधिकृत फिर्याद दाखल केली.
शनिपेठ पोलिसांनी भुषण महाजन, लोकेश महाजन आणि परेश महाजन यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी भुषण महाजन याला अटक केली आहे. लोकेश महाजन आणि परेश महाजन यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी करत असून, तपासामध्ये आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.









