घात झाल्याची चर्चा, जळगावातील एमआयडीसी परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – येथील एमआयडीसी परिसरातील नवीन गुरांचा बाजार परिसरामध्ये ट्रान्सपोर्ट नगरातील कामगारांचे रात्री वाद झाले. त्यानंतर सकाळी तरुण ट्रक चालकाचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे. दरम्यान या ट्रकचालकाचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला असता तेथे कुटुंबीयांनी आक्रोश केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.
सागर रमेश पालवे (वय २५, रा. मालदाभाडी ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो अनेक वर्षांपासून ट्रान्सपोर्ट नगरातील विकास लकडे यांच्या विदर्भ ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून कामाला होता.
गुरुवारी ७ सप्टेंबर रोजी ट्रान्सपोर्ट नगरात त्याचा काही लोकांसोबत वाद झाला होता.असे समजते त्यानंतर तो झोपायला गेला होता. सकाळी त्याचा संशयास्पद स्थितीमध्ये मृतदेह आढळून आला. यावेळी ट्रान्सपोर्ट नगरातील काही नागरिकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले.यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी रवाना झाले. तसेच रुग्णालयात येऊन त्यांनी माहिती जाणून घेतली. मयत सागर पालवे यांच्या पश्चात आई नीलम, वडील रमेश व एक विवाहित बहीण असा परिवार आहे. तो अनेक वर्षांपासून ट्रक चालक म्हणून काम करत होता. तरुण मुलगा गेल्यामुळे आईचा आक्रोश हृदय द्रावक झाला होता.
दरम्यान रात्री त्याचे काही सहकार्यांसोबत वाद झाले होते. त्या वादातूनच त्याचा घात झाला नाही ना अशी चर्चा ट्रान्सपोर्ट नगरात सुरू आहे. दरम्यान पोलीस घटनेची कसून चौकशी करीत असून पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.