जळगावात गणेश नगर परिसरातील घटना, व्यापारी बांधवांसह समाजमन हेलावले !
जळगाव (प्रतिनिधी) : येथील एका तरुण व्यापाराने नैराश्यातून आईच्या घरी जाऊन पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दि. ९ मे रोजी गणेश नगर भागात उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी तरुणाच्या ३ वर्षीय मुलाचा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्याच्या घरी कार्यक्रमाची तयारी असताना दुसरीकडे आईच्या घरी जाऊन पित्याने गळफास लावून घेतला. या घटनेमुळे समाजमन हेलावले असून जळगावात शोककळा पसरली आहे.
अमित नंदलाल कटारिया (वय ३२, रा. आदर्श नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो दोन महिन्यांपूर्वीच आदर्श नगरात पत्नी, तीन वर्षाचा मुलगा सन्मित यांच्यासह राहायला आला होता. महात्मा फुले मार्केट येथे ‘चुनरी कलेक्शन’ नावाने त्याचे कपड्याचे दुकान आहे. त्यातूनच तो परिवाराचा उदरनिर्वाह करतो. गुरुवारी ९ मे रोजी त्याचा मुलगा सन्मित याचा वाढदिवस होता. दुपारी १ वाजता तो त्याच्या आई, वडिलांच्या घरी गणेश नगरात भेटायला गेला होता. तेथे तो वरच्या खोलीत गेला. तासभर झाला तरी मुलगा खाली आला नाही, म्हणून अमित यांच्या आईने त्याला फोन लावला. पण त्याने उचलला नाही. दरवाजाजवळ आवाज दिला पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आईने दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला, तेव्हा समोर मुलगा अमित पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.
यावेळी आईने एकच हंबरडा फोडला. आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुगड यांनी तपासून अमितला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला. यावेळी व्यापारी बांधव देखील रुग्णालयात आले होते. दरम्यान, अमित कटारिया याने आत्महत्या केल्याचे कारण समजून आलेले नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.