जळगाव शहरात रामानंदनगर परिसरात शोककळा
जळगाव ( प्रतिनिधी ) – नशिराबाद उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या चिंचोली येथील तरुण आरोग्यसेवकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवार दि. ४ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजता घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भूषण बाळकृष्ण महाजन (वय ३७, रा. रामानंदनगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी यांच्यासह राहत होता. सार्वजनिक आरोग्य विभागात नशिराबाद उपकेंद्रअंतर्गत चिंचोली येथे तो आरोग्यसेवक म्हणून सेवा देत होता.(केसीएन)दरम्यान, शनिवारी दि. ४ ऑक्टोंबर रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास भूषणला छातीत त्रास सुरू झाला. त्याच्या मामेभावाच्या मदतीने त्याला एका खाजगी दवाखान्यात घेण्यात आले. मात्र या दवाखान्यातून पुढील उपचारासाठी दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जा असे सांगण्यात आले. त्यानंतर रिंग रोडवरील दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच भूषणला हृदयविकाराचा झटका आला.
यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे त्याला दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. भूषणचे आई-वडील हे सुरतला गेले होते. तर त्याचा भाऊ हा मंत्रालयात नोकरीला होता.(केसिएन)ते सकाळी रुग्णालयात आले त्यावेळेला रुग्णालयात कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. घटनेप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.