औरंगंबााद ( वृत्तसंस्था ) – मित्र , मैत्रिणींच्या छळाला कंटाळून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने काल गळफासाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

शहरातील बाबा चौकातील म्हाडा कॉलनीत किशोर भटू जाधव (29 वर्षे) या एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने गुरुवारी खोलीबाहेर गळफास घेतल्याची घटना घडली. किशोर जाधव हा दोन वर्षे धुळ्यात तर औरंगाबादमध्ये चार वर्षांपासून परीक्षेच्या सरावासाठी राहत होता. काल आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात मित्र-मैत्रिणींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.
गुरुवारी किशोरने आत्महत्या केल्याचे उघड झाले. बुधवारी सायंकाळी किशोरने आई-वडिलांना फोन केला होता. मला स्पर्धा परीक्षेत कमी गुण मिळाले असून अपयश आल्याची खंत त्याने व्यक्त केली. वडिलांशी बोलताना नाही. मात्र आईशी बोलताना त्याने निराशा दर्शवली होती. मात्र खचून न जाता अजून प्रयत्न कर, नाही तर घरी ये, अशी समजूत आई-वडिलांनी काढली होती.
महिनाभरापूर्वीच किशोर जाधवच्या खोलीवर दोन नवीन मुले राहण्यासाठी आली होती. बुधवारी जेवण झाल्यावर सगळे झोपले. मात्र सकाळी सहकाऱ्यांना तो खोलीत दिसला नाही. नेहमीप्रमाणे अभ्यासिकेत गेला, असे असे वाटले. मात्र मित्रांना तो खोलीच्या बाहेर लटकलेल्या अवस्थेत दिसला. घटनेची माहिती कळताच सहाय्यक आयुक्त विवेक सराफ, निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. या पाहणीत त्यांना आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळली. त्यात किशोरने काही मित्र मैत्रिणींची नावे लिहिलेली असून आर्थिक व्यवहार व मानसिक त्रास झाल्यासा उल्लेख केला आहे. किशोरच्या अंतिमसंस्कारानंतर त्याचे नातेवाईक तक्रार दाखल करणार आहेत.
किशोर याआधी पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा पास झाला होता. मात्र उंची कमी पडल्याने संधी मिळाली नाही. त्यानंतर अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून नोकरीही मिळाली होती. पण क्लास वन अधिकारी व्हायचे स्वप्न असल्यामुळे त्याने नोकरी स्वीकारली नाही. त्यावेळी स्पर्धा परीक्षेत त्याला 26 वा क्रमांक मिळाला होता. एसटीआय प्रथम परीक्षेतही यश मिळाले होते. आता दुसऱ्या परीक्षेची त्याची तयारी सुरु होती. फेब्रुवारीत दिल्ली येथे त्याने मुलाखतही दिली होती. त्याचा निकाल येणे बाकी आहे.
किशोरचे वडील भटू हरी जाधव हे वाघाडी खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यांना तीन मुले आहेत. मोठा मुलगा विकास हा पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर तर धाकटा चेतन नागपूर येथे खंडपीठात लिपिक आहे. किशोर हा दुसरा मुलगा होता. स्पर्धा परीक्षेची तयारी करून तो अधिकारी होण्याचे स्वप्न पहात होता.







