जळगाव शहरातील महाबळ कॉलनी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील महाबळ कॉलनी परिसरात बुधवारी दि. ६ ऑगस्ट रोजी दुपारी वाळत घातलेले कपडे काढताना तारांमध्ये विद्युत प्रवाह शिरल्याने वृद्ध महिलेला विजेचा जबर धक्का बसल्याने त्या जागीच मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भावना राकेश जाधव (वय ७१, रा. महाबळ कॉलनी, जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. महाबळ परिसरात कुटुंबियांसह वास्तव्य करणाऱ्या भावना जाधव या रोजच्याप्रमाणे दुपारी वाळवायला टाकलेले कपडे काढत असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. घटनेनंतर लगेचच घरातील सदस्य आणि शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषीत केले. या घटनेनंतर जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नातेवाईकांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनकामी दाखल केला. रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.