जळगाव शहरात सम्राट कॉलनी येथे कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील सम्राट कॉलनी परिसरात हातात तलवार घेऊन दहशत माजवत असलेल्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने गुरूवारी १२ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धीरज दत्ता हिवराळे (वय २२, रा. सम्राट कॉलनी, जळगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्यावर यापूर्वीही दोन गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. जळगाव शहरातील सम्राट कॉलनी परिसरातील हूडकोसमोर एक व्यक्ती हातात तलवार घेऊन आरडाओरडा करत दहशत निर्माण करत आहे. या गंभीर माहितीची तात्काळ दखल घेत, संदीप पाटील यांनी पथकाला घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत धीरज दत्ता हिवराळे याला हातात तलवार घेऊन दहशत माजवत असताना पकडले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याच्यावर यापूर्वीच दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.
ही कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण भालेराव, अक्रम शेख, विजय पाटील, हरीलाल पाटील, किशोर पाटील, प्रदीप चवरे आणि रवींद्र कापडणे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे.