चाळीसगाव तालुक्यात उंबरखेड येथे पोलिसांची कारवाई
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील मेहुणबारे पोलिसांच्या पथकाने अवैध शस्त्रे बाळगणारे दोन इसमांवर कारवाई करुन, त्यांच्या ताब्यातून तलवार व कुकरी हे शस्त्र जप्त केले आहे. त्यांच्याविरुद्ध मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगांव कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगांव उप विभाग विजयकुमार ठाकुरवाड, यांनी पोलीस स्टेशन हददीत अवैध शस्त्रे बाळगून दहशत करणाऱ्या इसमांवर कारवाया करणेबाबत मार्गदर्शनपर सूचना दिल्या होत्या. दि.२ रोजी मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीतील दोन इसम हे त्यांच्या ताब्यात अवैध शस्त्रे बाळगून दहशत करीत असलेबाबत माहीती प्राप्त झाली होती.
सदर गोपनिय माहितीच्या आधारे संशयित आरोपी सुकलाल सुरेश सोनवणे, किरण यशवंत सोनवणे (दोघे रा.उंबरखेड, ता.चाळीसगांव) हे भिका सिताराम गायकवाड यांचे घर, उंबरखेड, ता. चाळीसगांव येथे विनापरवाना अवैधरित्या एक धारदार लोखंडी तलवार व एक धारदार लोखंडी कुकरी अशी धारदार शस्त्रे स्वतः जवळ बाळगताना मिळून आले. सदरची शस्त्रे जप्त करून त्यांना ताब्यात घेण्यात आले, त्यानंतर दोन्ही आरोपीतांविरूध्द मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास मेहुणबारे पोलीस स्टेशन करीत आहे. सदरची कामगिरी प्रभारी अधिकारी प्रविण अ. दातरे, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उप-निरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस उप निरीक्षक विकास शिरोळे, पोहेको मोहन सोनवणे, कुशल शिंपी, बाबासाहेब पगारे, पोकों विनोद बेलदार, भुषण बावीस्कर, चापोकों ईश्वर देशमुख यांनी केली आहे.