रामानंदनगर पोलीस स्टेशनची कारवाई
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील खंडेराव नगर परिसरात हातात कोयता घेऊन दहशत माजवत असलेल्या एका हद्दपार आरोपीला रामानंद नगर पोलिसांनी सोमवारी २१ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता रंगेहात अटक केली आहे. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना खंडेराव नगर भागात समाधान हरचंद भोई (वय ३२, रा. खंडेराव नगर, जळगाव) हा व्यक्ती हातात धारदार कोयता घेऊन परिसरात दहशत माजवत असल्याची माहिती मिळाली. बातमीची गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक गुंजाळ यांनी तात्काळ रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोउपनि सचिन रणशेवर, पोहवा सुधाकर अंभोरे, जितेंद्र राठोड, जितेंद्र राजपूत, सुशील चौधरी, पोना अतुल चौधरी आणि योगेश बारी यांना बोलावून बातमीच्या ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार, पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, समाधान भोई हातात धारदार कोयता घेऊन दहशत माजवत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तो जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आदेशान्वये दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केलेला आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी समाधान भोई याला धारदार कोयत्यासह पोलीस ठाण्यात हजर केले असून, त्याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक यांच्या आदेशान्वये पोहवा सुधाकर अंभोरे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.