तापी-पूर्णा नद्यांच्या संगमावरील ऐतिहासिक पुरातन मंदिराकडे दुर्लक्ष
चंद्रकांत कोळी (भाग १)
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि राज्यात अनेक पुरातन मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी विविध सोयीसुविधा पुरवल्या जातात. मात्र, याला जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरजवळ असलेले श्रीक्षेत्र चांगदेव मंदिर अपवाद ठरले आहे. या मंदिराकडे शासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार भाविक करत आहेत. तालुक्यात ३ लोकप्रतिनिधी लोकसभा, विधानसभा, विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करीत असून मात्र गंभीर दुर्लक्ष झाले आहे.
हेमाडपंथी शैलीत बांधलेले हे मंदिर पेशव्यांच्या काळात तयार झाल्याचे मानले जाते. या मंदिरातील दगडी बांधकाम आणि कोरीव कलाकृती आजही पाहण्यासारख्या आहेत. राज्यभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात, परंतु अनेक वर्षांपासून इथे मूलभूत सोयीसुविधांची वाणवा आहे. मंदिराची दुरवस्था आणि अस्वच्छता पाहून येथील विकासाचा ‘सूर्य’ कधी उगवलाच नाही, असे वाटते. या परिस्थितीला शासकीय अधिकारी आणि सर्वपक्षीय राजकीय मंडळींचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे बोलले जाते. मुख्य चांगदेव मंदिरासह महानुभव पंथाचे चक्रधर स्वामी मंदिर, शनि मंदिर आणि गणपती मंदिर अशी एकूण चारही मंदिरे सध्या दयनीय अवस्थेत आहेत. तापी आणि पूर्णा नद्यांच्या संगमावर असलेल्या या ठिकाणी चांगदेवांनी तपश्चर्या केली होती आणि इथेच महादेवाची पुरातन पिंड आजही पाहायला मिळते.
याबाबत अधिक माहिती घेतली असता, हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असल्याने त्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही विकासकाम करता येत नाही. यामुळे लाखो भाविकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे तालुक्यातून लोकसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या व केंद्रीय राज्यमंत्री असणाऱ्या रक्षाताई खडसे, विधानसभेत असलेले तालुक्याचे आ. चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करीत असलेले आ. एकनाथराव खडसे या स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून मंदिराचा विकास करावा आणि भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.