एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील घटना, दोन्ही तलवारी जप्त
जळगाव (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील श्रीराम चौकात सार्वजनिक जागी दोन संशयित आरोपींनी मिरवणुकीमध्ये बेकायदा शस्त्र बाळगून लोखंडी तलवारी हवेत फिरविल्या. तसेच, दहशत पसरवून शांतता भंग केला म्हणून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कासोदा पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल लहू पुंडलिक हटकर (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी दि. ९ ऑगस्ट रोजी एका सार्वजनिक मिरवणुकीमध्ये निपाणे गावात श्रीराम चौकामध्ये बेकायदा लोखंडी तलवार बाळगून मिरवणुकीमध्ये हवेत फिरवून दहशत पसरवण्यात आली. तसेच घोषणा देऊन सार्वजनिक शांततेचा भंग करण्यात आला. याबाबतची माहिती मिळताच कासोदा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानुसार संशयित आरोपी अशोक काशिनाथ भील (वय २५), गुलाब भिवसन भिल (वय ५६) दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून दोन फूट लांबीच्या २ लोखंडी तलवारी, ६ इंचाची लाकडी मूठ असलेल्या प्रत्येकी १ हजार रुपये किंमत असलेली जप्त करण्यात आलेल्या आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील करीत आहेत.