जामनेर शहरातील सोनबर्डी येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी) : शहरात सोयगाव तालुक्यातून आलेल्या व मामाकडे राहत असलेला १५ वर्षीय मुलगा जामनेर येथील सोनबर्डी येथे नगरपरिषदेच्या जलतरण तलावात मित्रांसोबत गेला होता. दरम्यान, पाण्यात पडून या मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी दि. २८ जानेवारी रोजी दुपारी ४ ते ५ वाजेच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संकेत निवृत्ती पाटील (वय १५ वर्ष रा. घोसाळा ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर, ह. मु. हिवरखेडा रोड, जामनेर) असं मयत मुलाचे नाव आहे. तो परिवारासह राहत होता. जामनेर शहरात तो मामाकडे शिकण्यासाठी आलेला होता. संकेत हा ८ वी चा विद्यार्थी आहे. (केसीएन)दरम्यान, जामनेर येथे सोनबर्डीच्या पायथ्याशी नगरपालिकेचा जलतरण तलाव आहे. तो बघण्यासाठी संकेत हा त्याच्या मित्रासोबत गेला होता. अचानक त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडायला लागला. तो दिसेनासा झाल्यामुळे नागरिकांनी तत्काळ जामनेर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली.
तर पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. आरोग्यदूत जालमसिंग राजपूत व सोबत एक तरुण यांनी संकेतला वाचवण्यासाठी प्रयत्न केले, परंतु काही वेळाने संकेतचा मृतदेह हाती लागला, अशी माहिती मिळाली.(केसीएन) कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. गेल्या दोन वर्षापासून बंद असलेल्या जलतरण तलावमध्ये नुकतेच पाणी भरण्यात आले होते. जलतरण तलाव चालू करण्यासाठी हे प्रयत्न होते. परंतु त्या अगोदर हि दुर्दैवी घटना घडली. या ठिकाणी कुठलेही सुरक्षारक्षक अथवा सुरक्षा व्यवस्था नसल्याने हि घटना घडल्याचे नातेवाईकांनी सांगितले.