पाचोरा पोलीस स्टेशनची कारवाई
पाचोरा (प्रतिनिधी) : अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडल्याने वाळू माफियांनी वाद घालत महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली होती. पथकातील तलाठ्याला एकाने ट्रॅक्टरवरून खाली ओढले. ही घटना अंतुर्ली खुर्द ता. पाचोरा येथे रविवारी सायंकाळी घडली होती. याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनने कारवाई करून चौघांना अटक केली आहे.
राज भाऊसाहेब पाटील, दुर्गेश ऊर्फ नानू भाऊसाहेब पाटील, विवेक ऊर्फ भावड्या वसंत पाटील, हिरालाल निंबा पाटील (सर्व रा. अंतुर्ली, खुर्द, ता. पाचोरा) अशी अटक करण्यात आलेल्या वाळू माफियांची नावे आहेत. अंतुर्ली खुर्द येथे अवैधरीत्या वाळूचा साठा करण्यात आल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली होती. यानंतर महसूल विभागातील चार जणांचे पथक या गावात पोहचले. त्यात निपाणेचे तलाठी तात्याराव माणिकराव सपकाळ, बाळद बुद्रुकचे तलाठी अतुल बापूराव पाटील, पुनगावचे तलाठी तेजस रोहिदास बन्हाटे आणि पाचोरा तलाठी गंगाधर अण्णाराव सुरनर यांचा समावेश होता. पथक तिथे पोहचले त्यावेळी एक ट्रॅक्टर गिरणा नदी पात्रातून येताना दिसले. पथकाने हे वाहन थांबवले असता, वाळू माफियांनी पथकाला मारहाण केली. तलाठी अतुल पाटील ट्रॅक्टरवर चढले असता त्यांना खाली ओढत वाळू माफियांनी ट्रॅक्टर पळवून नेले होते. त्याठिकाणी ६४ हजार रुपयांची अवैध वाळू जप्त करण्यात आली होती.