चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र.चा. येथील घटना
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव शहरापासून जवळच असलेल्या टाकळी प्र.चा. येथील गुरुदत्त हौसिंग सोसायटीसमोर रस्त्यावरून नातेवाइकांचे सांत्वन करून घराकडे पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे ९० हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिभा सुभाष वाणी (५८, रा. अभिनव शाळेसमोर, गुरुदत्त कॉलनी, टाकळी प्र.चा.)या कॉलनीतील महिलांसह नातेवाईक मयत झाल्याने सांत्वन करून खरजई नाका येथून घराकडे पायी जात होत्या. अज्ञात इसम समोरील बाजूने दुचाकीवरून आले व त्यातील एक इसम पायी उतरून प्रतिभा वाणी यांच्याकडे आला. त्याने गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून तोडून दुचाकीवरून पडगाव रोडच्या दिशेने पळ काढला.
ही घटना गुरूवार २९ मे रोजी सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास घडली. चोरट्यांनी २३ ग्रॅम वजनाची सुमारे ९० हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत लांबवली. याप्रकरणी प्रतिभा वाणी यांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दिल्यावरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दखल करण्यात आला आहे.