जिल्हा प्रशासनाकडून माहिती ; ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव
जळगाव (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा २०२५ चा निकाल सोमवार दि. १८ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेस एकूण २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवारांनी परीक्षा दिली.
सदर परीक्षा IBPS या संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीने २७ मे ते ३० मे २०२५ आणि २ जून ते ५ जून २०२५ या कालावधीत राज्यातील २६ जिल्ह्यांतील ६० परीक्षा केंद्रांवर पार पडली होती. बी.एड. व डी.एल.एड. परीक्षेसंदर्भातील ताज्या आकडेवारीनुसार, बी.एड. परीक्षेचे १५ हजार ७५६ व डी.एल.एड. परीक्षेचे १३४२, असे एकूण १७ हजार ०९८ उमेदवार प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी बी.एड. ९९५१ व डी.एल.एड. ८२७, असे मिळून एकूण १० हजार ७७८ उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, ज्या उमेदवारांनी आवश्यक व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे निर्धारित मुदतीत परीक्षा परिषदेकडे सादर केलेली नाहीत अशा बी.एड. ५८०५ व डी.एल.एड.५१५, असे एकूण ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. निकालासंबंधीची गुणयादी व गुणपत्रक (Score List & Score Card) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर www.mscepune.in उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांनी आपले गुणपत्रक ३१ ऑगस्टपर्यंत डाउनलोड करून घ्यावे, असे परिषदेने कळविले आहे. विहित मुदतीपर्यंत डाउनलोड न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील आणि नंतर कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.