धुळ्याच्या बैठकीत दिले नियुक्तीपत्र, संघटनात्मक बांधणीला नवे बळ!
जळगाव (प्रतिनिधी) :- सामाजिक बांधिलकी आणि युवा नेतृत्वाला प्रोत्साहन देणाऱ्या टायगर ग्रुप, भारत या संघटनेने धरणगाव तालुक्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड केली आहे. यामुळे संघटनेच्या कार्याला आणि सामाजिक उपक्रमांना अधिक गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
संस्थापक अध्यक्ष जालिंदर जाधव आणि राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या आदेशानुसार तसेच टायगर ग्रुप उत्तर महाराष्ट्र प्रमुख सागर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. टायगर ग्रुप खान्देश अध्यक्ष ऋषिकेश भांडारकर यांच्या धुळे येथील कार्यालयात झालेल्या या बैठकीत, कार्यकर्त्यांच्या मागील काळातील कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून धरणगाव तालुक्यात सामाजिक उपक्रम आणि युवक सक्षमीकरणाच्या विविध पातळ्यांवर सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना यावेळी नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
यात कल्पेश कोळी यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे, तर शहबाज शाह यांच्याकडे तालुका उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भूषण महाजन यांची तालुका संपर्कप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. शहर पातळीवर विजय मोहिते यांना शहराध्यक्षपद देण्यात आले असून, सुनील कुराडे यांची शहर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. या निवडींमुळे संघटनेच्या कामकाजात नवा उत्साह संचारणार असून, तालुक्यातील सामाजिक कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास खान्देश अध्यक्ष ऋषिकेश भांडारकर यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, “संघटनेच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आपली विचारधारा पोहोचवण्याचे काम ही नवी कार्यकारिणी निश्चितच करेल.” नवीन पदाधिकाऱ्यांनी आपल्या निवडीनंतर संघटनेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आगामी काळात टायगर ग्रुपच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण उपक्रम आणि युवकांसाठी मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. टायगर ग्रुपचा विस्तार आणि सामाजिक जाणीव तालुक्यात अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही नवी कार्यकारिणी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास स्थानिक पातळीवरून व्यक्त होत आहे.