नाशिक ( प्रतिनिधी ) – तहसीलदारांच्या संमतीपत्रानंतर कोरोनाने मृत व्यक्तींच्या वारसांना 50 हजारांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. लवकरच राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांकडून प्रत्येक जिल्ह्यात समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-19 या आजाराने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केले आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती शासनाकडून अधिसूचित करण्यात येणार आहे.
एखाद्या कुटुंबातील एक व्यक्ती कोरोनाने मृत झाला असेल, तर त्याच्या नावावरचे सानुग्रह अनुदान मिळावे म्हणून एकपेक्षा जास्तही अर्ज येऊ शकतात. हे लक्षात घेता अनुदान मिळवण्यासाठी आता वारसांना तहसीलदारांची स्वाक्षरी असलेले संमतीपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.
मदत व पुनर्वसन विभागाकडून सानुग्रह अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज कार्यपद्धतीबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. सानुग्रह अनुदानाबाबत कोणत्याही खासगी व्यक्ति किंवा संस्था यांना कागदपत्रे देवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.