वाळू वाहतुकीच्या बदल्यात घुसखोरी ; जळगाव एसीबीची कारवाई
भुसावळ (प्रतिनिधी) : वाळू वाहतुकीस परवानगी देण्यासाठी आणि कारवाई टाळण्यासाठी ७३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी, कोतवाल आणि पंटर या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. ही धडक कारवाई सोमवार दि. १३ ऑक्टोबर रोजी दुपारी यावल नाका परिसरात करण्यात आली.
तक्रारदाराकडून तहसीलदार नीता लबडे यांच्या नावाने प्रथम ८० हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तडजोडीनंतर ७३ हजार रुपये ठरले आणि ही रक्कम स्वीकारताना तिघांनाही अटक करण्यात आली. वराडसीमचे तलाठी नितीन पंडितराव केले, कठोऱ्याचे कोतवाल जयराज रघुनाथ भालेराव आणि तिघ्रे (साकेगाव) येथील खाजगी पंटर शिवदास लटकन कोळी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे जळगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला. तक्रारदाराला वाळूचे वाहन सुरळीत चालवायचे होते, मात्र अधिकाऱ्यांनी त्याला गैरमार्गाने पैसे देण्यास भाग पाडले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे ७३ हजारांची रक्कम देताना हे तिघे पकडले गेले. जिल्ह्यात सध्या वाळू वाहतुकीवर बंदी असतानाही, उच्च अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून ही वाहतूक सुरू ठेवली जात असल्याचे या कारवाईतून उघड झाले आहे. या कारवाईने भुसावळ तहसील कार्यालय आणि महसूल विभागात खळबळ उडाली आहे. सदर कारवाई उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी केली.