गरिबांचे नुकसान, जळगाव शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील कांचन नगर भागात एका घरी दशक्रिया विधीचा कार्यक्रमात स्वयंपाक सुरू असताना गॅस लिक झाल्यामुळे भीषण आग लागली. त्यात घरातील वस्तू जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी सकाळी घडली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
सुभाष भाऊलाल बावीस्कर यांच्या शेजारी वृद्ध व्यक्तीचे निधन झाले आहे.त्यानिमित्त दशक्रिया विधीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वयंपाक करण्यासाठी सुभाष बाविस्कर यांनी त्यांची खोली शेजारच्यांना दिली होती. स्वयंपाक सुरू असताना अचानकपणे गॅस लिक झाला व त्यामुळे अवघ्या काही क्षणातच या ठिकाणी भीषण आग लागली. या भीषण आगीत खोलीत असलेले सर्व कपडे तसेच संसार उपयोगी साहित्य सर्व खाक झाले.
घटनेची माहिती नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. नागरिकांनीदेखील आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आटोक्यात आली नाही. महापालिकेचा अग्निशमन विभागाचा बंब उशिराने पोहोचला . त्यामुळे आगीत संपूर्ण घर खाक झाल्याचा आरोप या आगीत नुकसान झालेल्या घराच्या मालकाने केला आहे. आगिबाबत माहिती देताना महिलेला अश्रू अनावर झाले होते. सुभाष बाविस्कर हे मजुरीचे काम करतात. अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना त्यात ही मोठी दुर्घटना घडल्यामुळे बाविस्कर कुटुंबीय उघड्यावर आले आहे. शासनाने मदत करण्याची मागणी होत आहे. या आगीत इतरही काही घरांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.