भुसावळ तालुक्यातील हतनूर येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील हतनूर धरण परिसर येथे वाढीव नऊ दरवाजांच्या कामासाठी आलेल्या मजुराने स्वतःसाठी पिण्यास आणलेली दारू पत्नीने पिल्याचा राग आल्याने तिला कमरेच्या पट्ट्याने मारहाण करून तिचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना शवविच्छेदनानंतर उघडकीस आली आहे. सुरुवातीला सर्पदंशाचा बनाव करणाऱ्या पतीचे पितळ डॉक्टरांच्या शवविच्छेदनात उघडले. याप्रकरणी वरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शांतीदेवी जितेंद्र हेमब्रम (वय ४०, रा. राजकिसन कॉलनी, ता. शक्तीनगर, जि. सोनभद्र, उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. हतनूर येथील वाढीव दरवाजाचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. या ठिकाणी परराज्यातील उत्तर प्रदेश, झारखंड येथील मजूर कामासाठी राहतात. जितेंद्र हेमब्रम व शांतीदेवी हे दाम्पत्यदेखील या ठिकाणी मजुरीचे काम करतात. रविवारी दुपारी जितेंद्र गंगाराम हेमब्रम (वय २५, रा. राजकिसन कॉलनी, ता. शक्तीनगर, जि. सोनभद्र, उत्तरप्रदेश) याने स्वतः पिण्यासाठी आणलेली दारू पत्नी व शेजारी असलेल्या करणी शिवराम यादव या दोघांनी पिल्याने संशयित जितेंद्र गंगाराम हेमब्रम याला राग आला. त्याने पत्नी शांतीदेवीला रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास जबर मारहाण केली.
यानंतर दारूच्या नशेत तिचा गळा दाबला. नंतर पितळ उघडे पडू नये म्हणून रुग्णालयात त्याने सायंकाळी साप चावल्याचे कारण डॉक्टरांना सांगून वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. पोलिसांना माहिती मिळताच ते दाखल झाले. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश उगले यांना मयत महिलेच्या अंगावर साप चावल्याचे कोणत्याही खुणा दिसून आले नाही. यामुळे सोमवारी सकाळी मयत महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले. यामध्ये गळा दाबला असल्याचा उघड झाले. त्यामुळे खून झाल्याचे उघड झाले. पोलीस हवालदार नावेद अली यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जितेंद्र गंगाराम हेमब्रमवर वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. सहा. निरीक्षक आशिषकुमार अडसूळ हे तपास करीत आहेत.