बुलडाणा जिल्ह्यात घडलेल्या घटनेने खळबळ (पहा व्हिडिओ)
नांदुरा ता.बुलडाणा (वृत्तसेवा) :- तालुक्यातील जिगाव प्रकल्पातील आडोळ खुर्द गावच्या नागरिकांनी विविध समस्यांसाठी स्वातंत्र्यदिनी दि. १५ ऑगस्ट रोजी पूर्णा नदीत जलसमाधी आंदोलनाला सुरू केले. ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये मागण्या संदर्भात विचारविनिमय सुरू असताना आंदोलनकर्ता विनोद पवार (४३) याने थेट पूर्णा नदी पात्रात उडी घेतली. यावेळी एकच धावपळ उडाली. त्याने शासनाचा निषेध नोंदविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो नदी पात्रात वाहून गेल्याने खळबळ उडाली आहे.
जिगाव प्रकल्पातील आडोळ खुर्द हे पहिल्या टप्प्यातील गाव आहे. परंतु प्रशासनाने या गावाकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे. २०१६ साली आडोळ खुर्द गावाला अतिशय कमी स्वरूपात घरांचा मोबदला देण्यात आला. त्यानंतर एक ते दोन वर्षात नवीन गावठाणात प्लॉट देणे आवश्यक होते. परंतु संबंधित खात्याच्या हलगर्जीपणामुळे २०२३ मध्ये येथील नागरिकांना प्लॉट वाटप झाली. एकाच प्रकल्पातील इतर गावांना वेगळा न्याय व आडोळ खुर्द गावाला वेगळा न्याय कशासाठी हा प्रश्न गावकरी विचारात आहेत.
वारंवार प्रशासनाकडे दात मागूनही न्याय मिळत नसल्याने गावकऱ्यांनी अखेर १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी मुलं बाळांसकट हे गावकऱ्यांनी जिगाव प्रकल्पाच्या पूर्णा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी १० वाजतापासून आंदोलन करणारे ग्रामस्थ नदीपात्राजवळ गोळा होण्यास सुरुवात झाली होती. वेळेवर योग्य ती मदत न मिळाल्याने विनोद हा पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला असून, त्याचा अद्याप शोध लागलेला नाही.