जळगाव ( प्रतिनिधी ) – एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापसाचे व्यापारी स्वप्नील शिंपी हत्याकांडात कट रचण्यासह अमलात येईपर्यंत सहभाग असलेल्या २ मुख्य सूत्रधारांपैकी १ पोलीस कर्मचारी असल्याचा धक्कादायक खुलासा आज दस्तुरखुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी केल्यानंतर खळबळ उडाली आहे .


जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी सांगितले की , या कारस्थानात सहभाग असलेल्यांची काही नावे आम्ही आताच उघड करू शकत नाही . कारण त्याचा तपासावर आणि पुढच्या कायदेशीर कारवाईवर विपरीत परिणाम होऊ शकतो . या हत्याकांडात जो कळीचा मुद्दा १५ लाख २८ हजार ४५० रुपये रोकड असलेल्या पिशवीचा आहे त्यातील ४ लाख ५१ हजार रुपये गायब असल्याचे काल पत्रपरिषदेत स्वप्नील शिंपी यांचे वडील रत्नाकर शिंपी यांनी सांगितले होते ही कमी असलेली ४ लाख ५१ हजार रुपये रक्कम अजून पोलिसांना सापडलेली नाही , तिची रिकव्हरी झालेली नाही . हा कट रचणारे २ मूळ आरोपी आहेत त्यापैकी एक पोलीस कर्मचारी आहे हे दोन्ही आरोपी या कारस्थानाचे नियोजन करण्यापासून ते अमलात येईपर्यंत घटनास्थळीही हजर होते असे आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले आहे , असेही ते म्हणाले . .
आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे . हा आरोपी पोलीस कर्मचारी याआधीही लाचखोरीच्या गुन्ह्यात , मेहुणबारे गुटखा धाडीच्या गुन्ह्यात व त्याच्याच पत्नीने दाखल केलेल्या ४९८ कलमानूसारच्या गुन्ह्यातही आरोपी आहे . अन्य २ अदखलपात्र गुन्हेही त्याच्याविरोधात दाखल झाले होते . हा पोलीस कर्मचारी सध्या आधीच्या गुन्ह्यांमध्ये निलंबित झालेला आहे . सहाव्या फरार असलेल्या आरोपीलाही लवकरच आम्ही पकडू . स्वप्नील चौधरी यांचा कामगार मित्र दिलीप चौधरी यांची भूमिका आतापर्यंतच्या तपासात फारशी दिसून आलेली नसली तरी तपासात हा मुद्दा पोलिसांनी विचारात घेतलेला आहे गायब असलेली ४ लाख ५१ हजार रुपयांची रक्कम शोधण्यासाठी पोलिसांना सर्व बाबी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत , असेही ते म्हणाले .
धरणगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे , चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक चोपडे , चोपड्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले धरणगावचे पोलीस निरीक्षक शेळके या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली होती सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी या तपासात ७२ तासांत धागेदोरे मिळवले. काल रात्री अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे . पुढील तपास धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेळके करीत आहेत .







