भुसावळ तालुक्यातील घटना
ऋषीस्वरुपदास हे शनिवारी सकाळी गुरुकुलचे प्रमुख के. के. शास्त्री यांच्यासोबत गुजरातमधील वडताल येथे जाणार होते. त्यांनी शुक्रवारी रात्री २ वाजेपर्यंत संस्थेच्या आवारात देखरेख केली. यानंतर सकाळी त्यांचा गळफास घेतलेला मृतदेह व खिशात चिठ्ठी आढळली. त्यात ‘वाय फाय कनेक्ट, मोबाइल चेक करा’ असा मजकूर लिहिला आहे. भुसावळातून जळगावला जाताना शहराबाहेर राष्ट्रीय महामार्गावर श्री स्वामी नारायण गुरुकुल संस्था आहे. २८ वर्षीय स्वामी ऋषीस्वरुपदास हे तेथे गेल्या १० वर्षांपासून सचिव म्हणून कार्यरत आहेत.
ऋषीस्वरुपदास हे शनिवारी दि.१४ रोजी सकाळी गुरुकुलचे प्रमुख आणि जळगाव येथील स्वामीनारायण मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेसाठी आलेले स्वामी के.के.शास्त्री यांच्यासोबत वडताल येथे जाणार होते. तत्पूर्वी त्यांनी शुक्रवारी रात्री २ वाजेपर्यंत गुरुकुलच्या आवारात सर्वत्र पाहणी केली. दरम्यान, शनिवारी सकाळी पूर्वनियोजनानुसार के. के. शास्त्री व इतर सहकारी गुजरातमध्ये जाण्यासाठी वाहन घेऊन तयार झाले होते. सर्व जण शास्त्री ऋषीस्वरुपदास यांची वाट पाहत होते. पण, बराच वेळ होऊनही ते आले नाहीत. त्यामुळे त्यांना आवाज देण्यात आला. पण, दोन-तीनवेळा आवाज देऊनही प्रतिसाद मिळाला नाही.
यामुळे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावण्यात आला. तरीही प्रतिसाद न मिळाल्याने खोलीची खिडकी उघडली. त्यावेळी ऋषीस्वरुपदास यांनी गळफास घेतल्याचे दिसले. ही माहिती भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात देण्यात आली. त्यांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला. त्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद केली.
पंचनामा करताना त्यांच्या खिशात इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात ‘वाय फाय कनेक्ट, मोबाइल चेक करा’, असे लिहिले होते. पोलिसांनी चिठ्ठी, मोबाइल, गळफासासाठी वापरलेली दोरी असे साहित्य जप्त केले. स्वामी ऋषीस्वरुपदास यांनी शुक्रवारी रात्री शेवटची चर्चा गुरूकुलचे प्रमुख के. के. शास्त्री यांच्याशी केली. सकाळी ६ वाजता वडताल येथे येण्याबाबत सांगितले. संस्थेच्या आवारात गस्त केल्यानंतर ते रात्री २ वाजेनंतर झोपी गेले. पण, सकाळीच धक्कादायक घटना उघडकीस आली.
स्वामी ऋषीस्वरुपदास हे मूळ भुसावळ येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील उमेश कडू भारंबे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. ऋषीस्वरुप हे अडीच वर्षांचे होते तेव्हापासून त्यांना गुरूकुलमध्ये सेवेसाठी दिले होते. त्यांचे शिक्षण गुरुकुल व नंतर गुजरातमध्ये झाले.