कमी बोलणे, कमी खाणे, कमी पिणे हे चांगल्या सुज्ञ व्यक्तीचे लक्षणे आहेत. साधु, साधक, श्रावक यांचा यात समावेश होतो. चवीला महत्त्व देणारे व्यक्ती भोजनाला सर्वस्व मानतात. स्वास्थाला महत्त्व देणारे व्यक्ती भोजनाला औषधाप्रमाणे मानतात तर साधनेला मानणाऱ्या व्यक्तींसाठी भोजन हे महत्त्वपूर्ण नसते. जीवनात फास्टफूड टाळून, दिनचर्चा बदलून, आरोग्यसंपन्न जीवन जगता येते. प्रत्येकाने स्वाद आणि विवाद ह्या दोन्ही गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. हितकारक, परिणामकारक आणि पथ्यकारक शाकाहार हेच निरोगी ठेवण्याचे माध्यम आहे. तर मैदा, मिठ, साखर हे विषाप्रमाणे सांगितले जातात. त्यामुळे आहारात ते कमी प्रमाणात घ्यावे किंबहूना टाळावे असा सल्ला धर्मसभेत शासनदीपक परमपुज्य सुमितमुनिजी महाराज साहेब यांनी श्रावक-श्राविकांना दिला.
संसारात राहून, भगवंताचे नामस्मरण करून मोक्षप्राप्तीचा मार्ग अनुभवता येऊ शकतो. सांसारिक माया, लोभापासून दूर आपल्याला ठेवता येऊ शकते. त्यासाठी धर्मआराधना केली पाहिजे. ज्या प्रमाणे नदी हे सतत वाहत असते, दुसऱ्यांना देत राहते त्यामुळेच तिचे पाणी गोड लागते, तर समुद्र हा घेत राहतो त्यामुळे त्याचे पाणी खारट लागते. त्याप्रमाणे धर्म आपल्या आयुष्यात नदी प्रमाणे कार्य करतो. समुद्रात नौका चालत असताना पाणी आत येऊ देत नाही त्यानुसार संसारात राहुन ही संसार आपल्यात येऊ देऊ नका यातच खऱ्या अर्थाने धर्माची ओळख होते. असे विचार आरंभी परमपूज्य श्री. भुतीप्रज्ञमुनिजी म. सा. यांनी व्यक्त केले.