धरणगाव नगरपालिकेतर्फे १६ हजार डस्टबिन वाटप, नव्या ट्रॅक्टरचे लोकार्पण
जळगाव (प्रतिनिधी) : महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. स्त्रियांनी केवळ घरापुरत्या न राहता उद्योग, समाजसेवा आणि प्रशासनातही मोठी झेप घ्यावी. स्वच्छ भारत अभियान, जल जीवन मिशन यांसारख्या योजनांमध्ये महिलांनी पुढाकार घेतला आहे. महिलांच्या प्रगतीशिवाय समाजाची प्रगती शक्य नाही, त्यामुळे महिलांनी स्वावलंबी बनावे. ओला आणि सुका कचरा वेगळा केल्यास त्याचा पुनर्वापर होऊन आर्थिक उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने कचरा वर्गीकरण करावे. स्वच्छता ही केवळ सवय नसून, ती एक जीवनशैली असली पाहिजे. या माध्यमातून पर्यावरण रक्षणासोबतच नगरपरिषदेच्या उत्पन्नातही वाढ होईल.धरणगाव शहर स्वछ व सुंदर करण्यासाठी नागरिकांना स्वच्छतेच्या उपक्रमात सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
धरणगाव नगरपालिकेच्या हद्दीतील ३१ महिला बचत गटांनी सुमारे १२ लाख म्हणजे १००% कर भरल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचा सत्कार करून व प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांनी जबाबदार नागरिकत्वाचे आदर्श उदाहरण सादर केले आहे. कर भरणे ही केवळ जबाबदारी नाही, तर विकासाची गुरुकिल्ली आहे, असे मत मंत्री पाटील यांनी व्यक्त केले. सत्कार सोहळ्यात बोलताना गुलाबराव पाटील यांनी महिलांच्या सहभागाचे कौतुक करत इतर नागरिकांनीही या बचत गटांचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले. शहराच्या विकासासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे, आणि जेव्हा महिला नेतृत्व पुढे येते, तेव्हा संपूर्ण समाजाला सकारात्मक दिशा मिळते, असेही त्यांनी सांगितले.सुरुवातीला महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
जागतिक महिला दिनानिमित्त धरणगाव नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत व सी. एस. आर. च्या माध्यमातुन 16 हजार डस्टबिनचे महिलांना मोफत वाटप व स्वच्छता व्यवस्थापन सुधारण्यासाठी नव्या ट्रॅक्टरचे लोकार्पण पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शहरातील स्वच्छता सुधारणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे आणि कचऱ्याच्या पुनर्वापरातून उत्पन्न मिळवणे. प्रत्येक घराला २ डस्टबिन वाटप करण्यात आले, जेणेकरून ओला व सुका कचरा वेगळा करता येईल. त्यामुळे कचऱ्यापासून खतनिर्मिती व पुनर्प्राप्ती प्रक्रिया सुलभ होईल आणि नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात प्रथमच धरणगाव नगर पालिकेने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे तसेच मुख्याधिकारी रामनिवास झंवर व सहकाऱ्यांचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी केले. सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले तर आभार कार्यालय अधिक्षक भिकन पारधी यांनी मानले. यावेळी मुख्याधिकारी रामनिवास झंवर, स्वच्छता निरीक्षक हैबतराव पाटील, कर निरीक्षक हितेश जोगी, सहाय्यक प्रकल्प संचालक तुषार सोनार, माजी नगराध्यक्ष अंजली विसावे, कल्पना महाजन, बचत गटांच्या प्रमूख पुष्पा सैंदाणे, महिला आघाडीच्या सुनिता पाटील, भारती चौधरी, दिक्षा गायकवाड यांच्यासहबचत गटाच्या महिलांसह तत्कालीन नगरसेवक, पदाधिकारी, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.