तालुक्यातील भादली रेल्वे रुळावरील घटना, नशिराबाद येथे शोककळा
जळगाव प्रतिनिधी तालुक्यातील नशिराबाद येथे सोमवारी दिनांक २२ सप्टेंबर रोजी रात्री कौटुंबिक वादातून एका विवाहितेने सहा वर्षांच्या मुलीसह धावत्या रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडली आहे. ही घटना भादली रेल्वे पुलाजवळ घडली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्यामागील कारण अस्पष्ट असून नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मनीषा चंद्रकांत कावळे (वय २८) आणि त्यांची मुलगी गौरी चंद्रकांत कावळे (वय ६) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
नशिराबाद येथील भवानी नगरात मनीषा कावळे या पती चंद्रकांत आणि दोन मुलींसोबत राहत होत्या. पती चंद्रकांत हे एमआयडीसीतील एका चटई कंपनीत काम करतात. सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पती घरी असताना, मनीषा यांनी गावातील एका ओळखीच्या बाईकडून रेशनचा तांदूळ आणायला जात असल्याचे सांगितले. सोबत त्यांनी लहान मुलगी गौरीला घेतले आणि त्या घरातून निघून गेल्या.
संध्याकाळपर्यंत त्या परत न आल्याने चंद्रकांत यांना चिंता वाटू लागली. त्यांनी पत्नी आणि मुलीचा शोध सुरू केला. मात्र, त्या दोघींचाही काही ठावठिकाणा लागला नाही. त्याच वेळी, भादली रेल्वे पुलाजवळ एक महिला आपल्या लहान मुलीसह रेल्वेखाली आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस कॉन्स्टेबल रूपेश साळवे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली असता, ते मनीषा आणि गौरी असल्याचे समोर आले. या घटनेमुळे कावळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेची माहिती मिळताच, नशिराबाद गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासामध्ये कौटुंबिक वाद हेच या घटनेमागे असू शकते असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास नशिराबाद पोलीस करत आहेत.