जामनेर तालुक्यात देवळसगाव येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी) :- पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर आंघोळीसाठी बैलांना नदीपात्रात घेऊन गेलेल्या देवळसगाव ता. जामनेर येथील २२ वर्षीय तरुणाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. फत्तेपूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुशील सुनील इंगळे (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दि. २१ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. शुक्रवारी पोळा सण असल्याने सुशील आपल्या बैलांना आंघोळ घालण्यासाठी सूर नदीकाठी गेला होता. मात्र, नदीचा प्रवाह आणि पाणी जास्त असल्याने तो खोल पाण्यात ओढला गेला. काही कळायच्या आतच पाण्याच्या लाटांमध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला.(केसीएन)ही घटना आजूबाजूला असलेल्या लोकांना समजताच त्यांनी सुशीलला वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, मात्र, पाण्याच्या प्रवाहापुढे ग्रामस्थांचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. काही क्षणातच नदीपात्रात बुडालेला सुशील दिसेनासा झाला. घटनेमुळे देवळसगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे इंगळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेप्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.