गर्जना पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गौरव
जळगाव (प्रतिनिधी):-पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि कुणबी मराठा समाजातील हजारो विवाह संबंध जुळवल्याच्या सामाजिक कार्याची दखल घेत, सुमित जानकीराम पाटील यांचा वावडदा येथील ‘गौरी उद्योग समूह’ येथे जाहीर सत्कार करण्यात आला.


गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील यांची नुकतीच निवड झाली आहे. या निवडीबद्दल आणि त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित या सोहळ्यात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सुमित पाटील यांनी पत्रकारिता क्षेत्रासोबतच ‘खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय संस्थे’च्या माध्यमातून समाजकार्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या यथार्थ निवडीबद्दल बोलताना उपस्थितांनी मत व्यक्त केले की, हा सत्कार त्यांच्या आजवरच्या निस्वार्थ सेवेचा गौरव आहे. परिसरातील सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो, असेही मान्यवरांनी यावेळी नमूद केले.
या कार्यक्रमाला पत्रकार तथा माजी प्राचार्य मंगल बी. पाटील, वावडदा गावातील ज्येष्ठ नागरिक लहू पाटील, हिंमत पाटील, ईश्वर येवले, संतोष कापडणे, अक्षय लाडवंजारी यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमित पाटील हे समाजभूषण पुरस्कार प्राप्त असून, ते खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, मराठा सेवा संघ वधुवर कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गौरी उद्योग समूहाचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.









