पित्याच्या त्रासाला कंटाळून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन लहान मुलांसह संपविले जीवन
चांदवड तालुक्यातील दिघवद गावातील घटना
नाशिक – दिघवद गावात घडलेल्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. रात्रंदिवस कष्ट करूनही वडिलांकडून सातत्याने होत असलेल्या हेटाळणीला वैफल्यग्रस्त झालेल्या दौलत हिरे यांनी आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.
चांदवड तालुक्यातील दिघवद येथील रोकडोबा वस्तीवर बुधवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. दौलत हिरे (३४), मुलगी प्रज्ञा (९) आणि मुलगा प्रज्वल (५) अशी मृतांची नावे आहेत. दौलत हे ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून कार्यरत होते. ग्रामपंचायतीचे काम सांभाळून पत्नीच्या मदतीने ते शेतीही पाहायचे. घरातील कोणतेही काम प्रामाणिकपणे केल्यानंतरही वडिल रामभाऊ हिरे सातत्याने त्यांच्याशी हेटाळणीपूर्वक बोलत असल्याने ते मानसिक तणावात राहत होते.
बुधवारी सकाळी पुन्हा वडिलांकडून तसेच बोलणे झाल्याच्या पार्श्वभूमीवर संतापाच्या भरात दौलत यांनी टोकाचा निर्णय घेतला. मुलगी आणि मुलाला सोबत घेत त्यांनी घरासमोरील विहिरीत उडी घेतली. विहिरीला कोणताही सुरक्षितता कडा नसल्याने तिघेही पाण्यात बुडाले. त्या वेळी पत्नी सोनाली हिरे या घरामागील शेतीत पिकांना पाणी देत असल्याने घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. काही वेळाने ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर पाईप व दोरखंडांच्या साहाय्याने तिघांना बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्नी सोनाली हिरे यांनी सासू-सासऱ्यांच्या सततच्या बोलण्याला कंटाळून पतीने हे पाऊल उचलल्याची तक्रार पोलिसांकडे दिली आहे. या तक्रारीच्या आधारे रामभाऊ हिरे, मिना हिरे आणि मृत दौलत हिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









