‘सध्याच्या भौतिक जीवनात खोटे बोलण्याशिवाय चालत नाही असा समज सर्वांनी करून घेतलेला आहे. आध्यात्मिक व भौतिक जीवनात सत्याची कास धरली पाहिजे. खोटे हे बोलणे वचन हेच आपल्याला ठाऊक आहे परंतु मन वचन आणि काया या तिन्ही माध्यमातून खोटा व्यवहार होत असतो. तुमची पुण्यवाणी वाढवायची असेल तर तुम्ही खरे म्हणजे ‘सत्य’ बोला व सत्याचेच आचरण करा…’ असा मोलाचा विचार परमपूज्य सुमित मुनीजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवचनात मांडला.
‘जैन आगम शास्त्रात सांगण्यात आलेल्या उदाहरणाचा आपल्या प्रवचनात त्यांनी संदर्भ घेतला, ते म्हणाले की, ‘श्रावक व साधू यांनी पाच गोष्टींचे पालन तंतोतंत करायला हवे. कन्या, गाय वा तत्सम पशु प्राणी यांचे विषयी खोटे बोलू नये, कोणाचीही मौल्यवान वस्तू किंवा ठेवा हडपने आणि खोटी साक्ष देणे या गोष्टी टाळाव्यात; म्हणजेच खोटे वचन व कृती यापासून दूर राहावे. खोटे बोलणे ही बाब तर १८ पापसस्थानांपैकी एक आहे. मुलीचे लग्न ठरविताना तिचे वय, शिक्षण, कर्तबगारी याबाबतीत आपण वास्तव परिस्थितीच्या विपरीत बोलतो. जे वास्तव आहे परंतु त्याच्या विपरीत कथन करणे म्हणजे खोटे बोलणे होय. दुसरे म्हणजे कोर्टामध्ये खोटी साक्ष देतो, साक्ष फिरवतो या गोष्टी करणे टाळले पाहिजे. यावेळी महाभारताचे दुर्योधन व युधिष्ठिर यांचे उदाहरण दिले. दुर्योधन हा आपल्याशी युद्ध करणारा आहे, तो प्रतिस्पर्धी आहे परंतु दुर्योधनाला धर्मराज युधिष्ठिर यांच्याकडे युद्धाबाबत सल्ला मागण्यासाठी जाण्याची इच्छा झाली. कारण धर्मराज हे कधीच खोटं बोलत नाहीत ह्या बाबत ते प्रसिद्ध होते. याच कारणामुळे धर्मराज युधिष्ठरांकडे दुर्योधन सल्ला मागण्यासाठी आला होता. म्हणूनच त्यांना ‘धर्मराज’ असे म्हटले जाते परंतु; आजच्या काळातील आपण सर्व जणू ‘अधर्मराज’ ठरलेले आहोत. पुण्यसंचय करण्यासाठी सत्याचे आचरण करणे अत्यंत आवश्यक आहे. असत्य हे सर्व सद्गुणांना नष्ट करणारे ठरते! त्यामुळे आपण सत्याची कास धरली पाहिजे…’ असे आवाहन प्रवचनातून देण्यात आले.
या प्रवचना आधी परमपूज्य ऋतुप्रज्ञ महाराज साहेब यांचेही प्रवचन झाले. त्यांनी शरण व अशरण या धार्मिक संकल्पना स्पष्ट केल्या, त्यावर यथोचित भाष्य करताना ते म्हणाले की, कल्याण साध्य करण्यासाठी नेहमी धर्म शरणी यायला हवे. याचप्रमाणे श्रेणिक राजाची पुढील भागाची कथाही त्यांनी उपस्थितांना सांगितली.