जळगाव ( प्रतिनिधी ) – भाजपच्या गटनेतेपदाच्या वादावरून भगत बालाणी यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीत कोर्टाने बंडखोर गटाच्या गटनेत्यांनी स्थायी समिती सदस्यपदाचे नामनिर्देशन करू नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. आता १७ नोव्हेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.
जळगाव महापालिकेतील भाजपच्या गटनेतेपदाचा वाद न्यायालयात पोहचला आहे. पक्षाचे गटनेते भगत बालाणी हे असल्याने त्यांचा व्हीप स्थायी समिती सभापती आणि सदस्यपदांच्या निवडीत ग्राह्य धरण्यात यावा अशी भाजपची मागणी आहे. बंडखोर गटाने दिलीप पोकळे हे गटनेते तर उपमहापौर कुलभूषण पाटील हे प्रतोद असतील असा ठराव करून त्या दृष्टीने स्थायी समितीसाठी नामनिर्देशनाची तयारी सुरू केली होती.
आपणच भाजपचे गटनेते आहोत या मागणीसाठी भगत बालाणी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. पहिल्या सुनावणीत कोर्टाने महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांना म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर आज पुन्हा न्यायालयात सुनावणी झाली.
दरम्यान १७ नोव्हेंबर रोजी अंतीम सुनावणी होणार असून तोवर दिलीप पोकळे यांनी स्थायी समिती सदस्यांचे नामनिर्देशन करू नयेत असे स्पष्ट निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत. यामुळे भगत बालाणी यांच्या याचिकेवरील निकालाच्या नंतरच स्थायीचा मार्ग मोकळा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.