मुंबई ( प्रतिनिधी ) – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात भाजपाचा हात असल्याचं मान्य आहे, असं मत व्यक्त केलं. एसटी कर्मचाऱ्यांचा त्यांच्या युनियन लिडरवर विश्वास नाही. त्यांनी कर्मचाऱ्यांना फसवलं आहे. सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना बरखास्त झाल्यात आणि आंदोलनाचं नेतृत्व भाजपाकडे आलंय, असंही विधान चंद्रकांत पाटलांनी केलं. ते भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकीत बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात त्यांच्या सर्व संघटना बरखास्त झाल्या आणि सर्व नेतृत्व भाजपाकडे आलं. त्यावर असह्य होऊन अवघड स्थिती झाल्यानं संजय राऊत वारंवार यात भाजपाचा हात असल्याचं म्हणत आहेत. कुठल्याही अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यात हात असेल तर आमचा हात आहे. आम्ही तो काही अमान्य करत नाही.”
“एसटी कर्मचाऱ्यांची भीषण स्थिती आहे. या बैठकीत आपल्याला या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर काय करायचं याचाही निर्णय करावा लागणार आहे. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर आठवडाभर एसटी कर्मचाऱ्यांसोबत आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत,” असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांवर टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या गावागावातून मागण्या आहेत की गोपीचंद पडळकरांना पाठवा, सदाभाऊ खोतांना पाठवा. ते त्यांच्या कुठल्याही युनियन लिडरचं नाव घ्यायला तयार नाही. कारण त्यांना सर्वांनी फसवलं आहे.”