नवी दिल्ली : रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात टिप्पणी केल्याच्या आणि जातीयवाद पसरवल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर डझनहून अधिक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तर याप्रकरणी अर्णबने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एमआर शाह यांचे दोन सदस्यीय खंडपीठ शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता अर्णबच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करणार आहे.
तर काँग्रेस-शासित राज्यांमध्ये अर्णबविरूद्ध खटले दाखल करण्याची मालिका अद्याप सुरूच आहे. काँग्रेस नेत्यांनी अर्णबवर पंजाब, छत्तीसगड, राजस्थान आणि झारखंडच्या वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये डझनहून अधिक एफआयआर दाखल केले आहेत.
पंजाबच्या बटाला येथे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोशन जोसेफ यांनी आपल्या तक्रारीत असा आरोप केला आहे की, टीव्ही चर्चेदरम्यान अर्णब गोस्वामी यांनी टीका करताना दोन समुदायांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. अबोहरमधील प्रदेश कॉंग्रेस युनिटच्या हरोमोहिंदरसिंग यांच्या तक्रारीवरून अर्णबविरुद्ध भादंवि कलम १५३ ए, १५३ ब, २९५ ए, ५०४अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याशिवाय कॉंग्रेस नेत्यांनी फतेहगड आणि रूपनगरमध्ये टीव्ही पत्रकाराविरूद्ध तक्रार देखील दाखल केली आहे.
कॉंग्रेस नेत्यांनी गुरुवारी राजस्थानच्या बीकानेरमधील न्यू टाउन आणि हनुमानगड जिल्ह्यातील हनुमानगड टाऊन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले. यापूर्वी बुधवारी जयपूरच्या दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात तक्रारी करण्यात आल्या.







