जळगाव : कोरोना संकटात ग्राहकांना अखंड वीजपुरवठा करण्यासाठी धडपडणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी मंगळवारी लसीकरण शिबीर आयोजीत करण्यात आले होते. त्यात सुमारे 252 कर्मचाऱ्यांनी लस घेतली.
कोरोना आपत्तीतही स्वतःचा जीव धोक्यात घालून, कोविड रुग्णालये व विलगीकरण कक्ष यांना सुरळीत व अखंडित वीज पुरविणे तसेच लॉकडाऊन कालावधीत ग्राहकांना सेवा उपलब्ध करून देण्याचे काम महावितरणचे कर्मचारी अहोरात्र करीत आहेत. इतर फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांप्रमाणेच तेही कोविड योद्धा म्हणून कार्यरत आहेत.
जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या निर्देशाने, महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता फारूक शेख यांच्या पुढाकाराने व जिल्हा शल्यचिकित्सक नागोराव चव्हाण यांच्या सहकार्याने महावितरण कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी मंगळवारी जळगाव परिमंडल परिसरातील लघु प्रशिक्षण केंद्र येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सुमारे 252 कर्मचाऱ्यांनी लस घेतली. याप्रसंगी अधीक्षक अभियंता फारूक शेख, सहाय्यक महाव्यवस्थापक(मासं) नेमिलाल राठोड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर, उपकार्यकारी अभियंता पराग चौधरी, व्यवस्थापक उद्धव कडवे उपस्थित होते. लसीकरणासाठी डॉ.सुहास बडगुजर, परिचारिका संगीता साबळे, प्रदीप पाटील, विकास धनगर, सतिष सोनवणे यांनी मोलाचे सहकार्य केले.